राज्यात सर्वत्र सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकऱ्याबरोबरच बागायतदार शेतकरी ही सोयाबीनकडे नकदी पिक म्हणून पाहत असतो. मात्र सध्या हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री सुरु आहे. सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मराठवाडा विभागात 48 लाख हेक्टर वर विदर्भ 55 लाख हेक्टरवर तर उर्वरित राज्यात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र आहे. यावर उपजीविका करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होताना दिसतो.
दरम्यान रविवारी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. बाजारपेठेत तब्बल तीन वर्षानंतर ही स्थिती आलेली पाहायला मिळत आहे. 4600 रुपयेच खाली भाव गेले होते. लातूर बाजारपेठेत रविवारी आठ ते नऊ हजार क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. सोमवारीही आठ ते नऊ हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे.
हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री
काही ठराविक ठिकाणीच सोयाबीनला हमीभाव एवढा दर मिळाला आहे. बाकी बाजारपेठेत दर हा 4400 ते 4500 दरम्यान मिळाला आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमी न सोयाबीनची विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं. शेतकऱ्यांना आवश्यकता असेल, तसं सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणलं जातं. मात्र, सोयाबीनचे दर दिवसेंदिवस पडत असल्यामुळे सोयाबीन आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे.
केंद्र सरकारची खाद्यतेल आयातीचे धोरण, त्यातच जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन, याचा थेट परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर खाली गेल्याने शेतकरी व्यापारी आणि उद्योजकासमोर आता प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळातही सोयाबीनचे दर वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत.
यामुळे सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये होणारी घसरण पाहता अनेक दिवस सांभाळलेल्या सोयाबीन पुन्हा सांभाळायची वेळ येते का, हा प्रश्न सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे.