मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मागील दोन दिवसांपासून देशात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, आता अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे वाऱ्याचा वेग कमी झाला आहे.
परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार होतंय. अशातच हवामान खात्याने काही राज्यांना पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील अहमदनगर, पुणे, जळगाव, महाबळेश्वर कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
भल्यापहाटे धुक्यासह थंडीचा कडाका जाणवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मात्र, येत्या २ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव कमी होऊन राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.