महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत, कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ आणि ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
पुढील ४८ तास राज्यात सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा इशारा दिलाय. देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंत उद्यापासून पाऊस कोसळणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर, पुण्यासह राज्यातील अनेक शहरासाठी पुढील ४८ तासांत यलो अलर्ट जारी केला आहे.
आज मुंबईत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे.
तर पुण्याला चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. कडाक्याच्या उन्हात पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. पण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसह वादळ, वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील पाच दिवस हे चित्र कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.