अवकाळीचं संकट कायम! 'या' जिल्ह्याला येलो तर ; विदर्भाला ऑरेंज अलर्ट
अवकाळीचं संकट कायम! 'या' जिल्ह्याला येलो तर ; विदर्भाला ऑरेंज अलर्ट
img
दैनिक भ्रमर
मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.

आयएमडीकडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


विदर्भात गारपिटीचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या परिणामी विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि  मराठवाडा जिल्ह्यांमध्ये  तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी  विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 kmph वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group