राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भासह मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत. अनेक घरांचे छप्पर उडून गेलं आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात अनेक ठिकाणच्या फलबागांचे तसेच पिंकाचे देखील या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
बीडमधल्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत. प्रशासनाने या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते.
मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं. मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं शेतातील उभा मका, भातपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत. तर, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच बागायती पिकांचाही नुकसान झालं आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.