काळजी घ्या! पुढील ३ दिवस राज्यातील ‘या’ भागात वादळी पाऊस तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
काळजी घ्या! पुढील ३ दिवस राज्यातील ‘या’ भागात वादळी पाऊस तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
img
Dipali Ghadwaje
राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सुरु असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागांना वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं. सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात अवकाळीची हजेरी पाहायला मिळत असतानाच राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील निवडक भागांमध्ये उष्णतेची लाट वाढणार आहे. तर, मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तापमान वाढ नोंदवली जाणार आहे. उष्णतेच्या लाटेसमान परिस्थिती इथं पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये दमट वातावरण अडचणी आणखी वाढवताना दिसणार आहे.

या भागांमध्ये तापमानात सरासरीहून किमान तीन अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. पुढील 48 तासांसाठी हीच स्थिती कायम राहणार असल्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.

दरम्यान, विदर्भाचा काही भाग आणि कोकणातील निवडक भाग वगळता पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वारे आणि पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. तर कुठे आकाश अंशत: ढगाळ राहील असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस होणार आहे. वादळ येण्याची शक्यता असून, यादरम्यान ताशी 40-50 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी 50-60 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group