गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील वातावरणात कमालीचे बदल होत असून कडक उन्ह्याच्या झळांमध्ये अचानकच अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उकाड्याने त्रस्त असलेल्या नारिकांना पावसामुळे थंडावा मिळाला असला तरीही अवकाळी पावसाने मात्र पुन्हा एकदा नागरिकांची तारांबळ उडाली आहे
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आज (रविवारी) देखील अवकाळी पावसाने नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. तर वाऱ्याचा वेग देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर होता.
दरम्यान , यंदा मान्सून केरळात लवकर दाखल होणार यंदा नैऋत्य मोसमी पाऊस देशात वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी म्हणजेच २७ मे रोजी केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.