मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण तर काही भागांत अवकाळी पावसाचं सावट आहे. विदर्भात तर पाऊस आणि तापमान असे दुहेरी संकट असल्याचे दिसून येत आहे.
पुढील २४ तासांत मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईत ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल , असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार आणि संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २४ अंश सेल्सिच्या आसपास असेल.