आनंदाची बातमी ! सौदी अरेबियातून मुंबईत कच्च्या तेलाचं जहाज दाखल
आनंदाची बातमी ! सौदी अरेबियातून मुंबईत कच्च्या तेलाचं जहाज दाखल
img
वैष्णवी सांगळे
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले सुरू आहेत, तर इराणकडूनही प्रत्युत्तरादाखल हल्ले होत आहेत. या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी  जवळपास बंद झाली आहे. इराणने या मार्गावरून होणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याची धमकी दिल्याने आणि काही जहाजांवर हल्ले केल्याने बहुतेक तेल टँकर आणि व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. याचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

दरम्यान महाराष्ट्रसाठी आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाने भरलेले एक जहाज यशस्वीरित्या होर्मुझची सामुद्रधुनी पार करून मुंबईत दाखल झाले आहे. हे जहाज लायबेरियाचे ध्वज असलेले शेनलॉन्ग नावाचे सुएझमॅक्स प्रकारचे टँकर आहे. काही दिवसांच्या प्रवासानंतर हे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे. 

जहाजाने इराणच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी प्रवासादरम्यान काही काळ सिग्नल सिस्टम बंद ठेवली होती. यात सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून १ लाख ३५ हजार ३३५ टन कच्चे तेल भरले गेले होते. इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी जहाजाने त्याचे सिग्नल सिस्टीम (AIS) बंद ठेवले होते. हे जहाज आज मुंबई बंदरात सुरक्षितपणे पोहोचले असून, मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.

जहाजातील हे कच्चे तेल मुंबई डॉकवरून माहुलमधील रिफायनरीकडे पाठवले जाणार आहे. हे जहाज भारतात पोहोचले ते अशा वेळी जेव्हा इराणने अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत आणि चीनकडे जाणाऱ्या जहाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही जहाजाला या पाण्याच्या मार्गातून तेल नेण्याची परवानगी न देण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापार मार्गांपैकी एक जवळपास पूर्णपणे बंद झाला आहे. जगातील सुमारे एक पंचमांश (२०%) कच्चे तेल होर्मुझ सामुद्रधुनीतून जाते.

या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, मुंबईकडे येणारे हे जहाज अत्यंत सावधगिरीने आणि खबरदारी घेऊन चालले होते. धोकादायक मार्गावरून जाताना शोधले जाण्यापासून वाचण्यासाठी जहाजाने त्याचे ट्रांसपॉन्डर आणि AIS (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम) बंद करून टाकले होते. यामुळे जहाजाचा मागोवा घेणे अशक्य झाले होते.


इतर बातम्या
Join Whatsapp Group