सावधान! फळांमधून विषबाधेचा धोका? पायधुनीतील ४ जणांच्या मृत्यूनंतर व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय
सावधान! फळांमधून विषबाधेचा धोका? पायधुनीतील ४ जणांच्या मृत्यूनंतर व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय
img
नितीशा कुलकर्णी





ज्या घरात काल रात्रीपर्यंत हास्यविनोद आणि गप्पांचा आवाज येत होता, तिथे आज केवळ सुन्न करणारी शांतता आणि अर्धवट राहिलेल्या अन्नाचा सडा उरला आहे. मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा 'कलिंगड' खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण घाटी मोहल्ला हादरला आहे.

ताटात पडलेली बिर्याणी आणि कापलेलं कलिंगड... मृत्यूच्या तांडवापूर्वीचं हे भयावह दृश्य पाहून नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या काळजाचं पाणी होत आहे. पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

कालपर्यंत हसण्या-बोलण्याने गजबजलेलं डोकाडिया कुटुंबाचं घर आज पूर्णपणे ओस पडलं आहे. घराच्या दाराशी फक्त चपलांचा खच दिसतो, तर आत गेल्यावर काल रात्रीचे अर्धवट अन्न तसेच पडलेले दिसते. अर्धवट राहिलेली बिर्याणी आणि कापलेले कलिंगड हे दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतात.

 नातेवाइकांचा आक्रोश

सोमवारी चौघांचे मृतदेह घरी आणण्यात आले. त्यावेळी नातेवाइकांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि घरात पूर्ण शांतता पसरली.

काय घडलं होत?

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने रात्री एकत्र जेवण केले होते. त्यानंतर उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वजण झोपले. पहाटेपासून त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच एकामागून एक मृत्यू झाले. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

शेजाऱ्यांकडून हळहळ व्यक्त

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब अतिशय साधं आणि आनंदी होतं. कुणाशीही वाद न करता शांतपणे राहणारे हे लोक अचानक गेल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. कलिंगडाबाबत संभ्रम या घटनेनंतर कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते हे कलिंगड ऑनलाइन मागवण्यात आले होते, तर काही जण ते नळबाजारातून खरेदी केले असल्याचे सांगतात. तसेच ते कलिंगड काही दिवसांपूर्वीचे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

कलिंगड न विकण्याचा निर्णय

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची चर्चा पसरल्यानंतर नळबाजार फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group