नवी मुंबईतुन मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय ५५) यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
माहितीनुसार, तक्रारदाराला १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील सुमारे ३.१६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी ७ टक्के कमिशन म्हणून २२,१७६ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ही मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
२५ मार्च रोजी तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केल्यानंतर ६ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली आणि लाच मागणीची खात्री पटली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सापळा रचून आहिरे यांना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.