देशातील निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. EVM वर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत ही महत्वाची बातमी आहे. पण नक्की मुंबई हायकोर्टाने हे आदेश का दिलेत या मागचं नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊयात. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निकाल देण्यात आला. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
2024 मधील विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगरमधील चांदिवली मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे हे शड्डू ठोकून होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दिग्गज उमेदवार नसीम खान होते. नसीम खान यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला. या निकालाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला होता.
न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत, गुरुवारी ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. ईव्हीएम उत्पादक बंगळुरू येथील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे पत्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना पाठवले आहे. त्यात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी हा निकाल दिला आहे.
2009 आणि 2014 च्या निवडणुकीत नसीम खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. पण त्यानंतर सलग दोनदा, 2019 आणि 2024 या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. पण यावेळी नसीम खान यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा निकाल हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे.