कल्याण शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कल्याण येथील शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर चार ते पाच जणांनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शक्ती राय यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, शक्ती राय यांची एक सेक्युरिटी एजन्सी आहे. संबंधित एजन्सीचा टेंडर संपल्यानंतरही दोन कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराचा वाद सुरू होता. याच वादातून संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह मिळून शक्ती राय यांच्यावर हल्ला केला असा आरोप केला जातोय.
घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास केला जात आहे.