मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसंदर्भातील युतीबाबत विधान केल्यानंतर राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिला असल्याने राज्याच्या राजकारणात नवी नांदी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान या युतीवर राज्यातील सर्व राजकीय नेते व्यक्त होत असताना आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे रस्त्यांच्या कामाच्या पाहणीसाठी वरळीत पोहोचले होते.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यातील युतीसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मी तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो की, दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे तुमच्या माध्यमातून बोलून झालं आहे. त्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून काही बोलणार नाही".
राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच दिला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. याबद्दल आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी आवाज उठवला. तेव्हाच विरोध का केला नाही?. तेव्हा बिनशर्थ पाठींबा देऊन तडजोड केली गेली. असे चालणार नाही. भांडण माझ्याकडून नव्हती. मी भांडण मिटवून टाकली. माझ्याबरोबर की भाजपबरोबर जायचं हे मराठी माणसांनी ठरवा. गद्दार सेना चालणार नाही. महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळ भांडणं विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकदा एकत्र आल्यानंतर भेटाभेटीचे कार्यक्रम चालणार नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.