छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आपल्या कुटुंबियांसोबत कारने कामानिमित्त बाहेर गेले होते. तेथून परतत असताना त्यांची कार रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळ आली.
यावेळी बाबा पेट्रोल पंपाजवळ काही लोकांचे भांडण सुरू होते. ही भांडणे सोडवण्यासाठी आमदार संजय शिरसाठ यांनी कार थांबवली. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने आमदार शिरसाठ यांच्या कारवर दगड फेकला.
यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आमदार शिरसाठ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलगा देखील होते.
दरम्यान, घटनेनंतर शहरातील शिवसैनिकांनी बाबा पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी गर्दी पांगवत शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. आमदार शिरसाठ यांच्या कारवर नेमका दगड कुणी भिरकावला याचा तपास पोलीस करीत आहेत.