'त्या' बेपत्ता दोन सख्ख्या बहिणींचा लागला शोध; तपासात धक्कादायक कारण उघड
'त्या' बेपत्ता दोन सख्ख्या बहिणींचा लागला शोध; तपासात धक्कादायक कारण उघड
img
वैष्णवी सांगळे
कल्याणमध्ये काही दिवसांपासून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता होत्या. त्या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरु होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक वेगात तपास केला आणि दोन मुलींना शोधून काढले आहे. सुरुवातीला या दोघींना एका मुस्लिम तरुणाने बेपत्ता केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक कारण समोर आलं आहे.

माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी घरातील दागिने घेऊन अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांना मुली सापडल्या नाहीत. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी घटनेची खोली लक्षात घेऊन तातडीने तपासाला सुरुवात केली. 

सुरुवातीला सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे हे हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र या दोन्ही मुली आपल्या मित्रांच्या घरी सुरक्षित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघींनीही धक्कादायक खुलासा केला.सावत्र आई आणि वडील सातत्याने मारहाण करतात तसेच शिक्षण घेऊ देत नाहीत, असा आरोप दोन्ही मुलींनी केला आहे. 

घरातील सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही स्वतःहून घर सोडले, असे त्यांनी स्पष्टपणे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात लव्ह जिहाद असा कोणताही प्रकार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.तसेच आम्हाला आमच्या आई-वडिलांसोबत राहायचे नाही, असा निर्णयही दोघींनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. मुलींच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group