कल्याण : कल्याण पश्चिम परिसरातील रोहिदासवाडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने पाचशे रुपयांच्या वादातून आपल्या सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे.
रात्री झोपल्यावर भावाने खिशातील पाचशे रुपये काढून घेतले, या संशयातून आरोपीनं भावावर घरातील भाजी कापायच्या चाकूने वार केले आहेत. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
याबबत मिळालेल्या माहितीनुसार , सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे. तर नईम शमीम खान असं मृत पावलेल्या भावाचं नाव आहे. रात्री झोपताना सलीमच्या खिशातून 500 रुपये गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर खिशात पैसे नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने खिशातील पैसे कुणी घेतले, अशी घरात विचारणा केली. पण पैसे कुठे गेले, कुणालाच माहीत नव्हतं. पण आपला लहान भाऊ नईम यानेच पैसे घेतले असावेत, असा संशय सलीमला होता. यातून त्याने नईमला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.
500 रुपयांवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की आरोपी मोठा भाऊ सलीम रक्ताचं नातं विसरला. त्याने घरातील चाकूने सख्ख्या भावावर सपासप वार केले. भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला. भावाची हत्या केल्यानंतर सलीम घरातून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत सलीमवर गुन्हा दाखल केला आणि अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. एका मोठ्या भावाने लहान भावाची पाचशे रुपयांसाठी अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा सविस्तर तपास कल्याण बाजारपेठ पोलीस करत आहेत.