छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे एका रिक्षात २० वर्षांच्या तरुणीचा गाडीमध्ये संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीचा प्रेमविवाह , पतीपासून विभक्त झाल्यानंतर दुसऱ्या मुलासोबत अफेअर या कारणाने आई संतप्त होती. लोक काय बोलतील या विचारातून आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याचा खून केला आहे.
नेमकं काय घडलं ?
२० वर्षीय नंदिनीने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचा संसार सुरळीत सुरू असला, तरी दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिल्याने ती माहेरी परतली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे दुसऱ्या एका तरुणाशी संबंध जुळल्याची माहिती पुढे आली. या नव्या नात्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे उघड झाले आहे.
‘समाजात बदनामी होईल, लोक काय बोलतील?’ या भीतीने आई भारती उमेश साबळे (वय 35) संतप्त होती, असे तपासात समोर आले आहे. वीस दिवसांपूर्वी आई-मुलगी वडगाव कोल्हाटी येथे राहायला आल्या होत्या. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून नेहमी भांडणांचे आवाज येत असत; मात्र परिस्थिती इतकी टोकाला जाईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.
घटनेच्या दिवशी दुपारी अंदाजे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून नंदिनीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. संतापाच्या भरात आई भारती साबळे हिने हे पाऊल उचलल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळण्यात आला. रात्री सुमारे 10.40 वाजता संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला नंदिनीचा मृतदेह आढळला.
तपासात मृतदेह कन्नड घाट परिसरात नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने हा प्रयत्न उधळला गेला. हत्या घडली त्या वेळी सावत्र वडील उमेश गोविंद साबळे (वय 40, रा. वडगाव कोल्हाटी) घराबाहेर असल्याचे सांगितले जात असले, तरी नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.