केवळ संशयाच्या कारणातून पतीने मित्राच्या मदतीने पत्नीचा निर्घृण खून केला आहे. धारदार शस्त्राने वार करत आणि त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचून तिची हत्या केली व मृतदेह तिथेच टाकून पसार झाले. दरम्यान हा खुनाचा आता उलगडा झाला आहे.
नेमकी घटना काय ?
विरार शिरवली गावाजवळील एका निर्जन शेतात २५ ते ३० वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून २१ मार्च रोजी आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोशन यादव (26) आणि त्याचा मित्र भानुप्रताप यादव (30) यांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. मृत महिलेचे नाव मधुबाला उर्फ प्रियाकुमारी यादव (22) असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी होती. रोशनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यातून त्यांच्यात सतत वाद होत असत. 19 मार्च रोजी रोशनने आपला मित्र भानुप्रताप याच्या मदतीने मधुबालाला फिरवण्याच्या बहाण्याने वज्रेश्वरी येथील दुर्गम भागात नेले. त्यानंतर दोघांनी मिळून मधुबालावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचून तिची हत्या केली व मृतदेह तिथेच टाकून पसार झाले.
वज्रेश्वरी सारख्या दुर्गम भागात पुरावे नसताना केवळ सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने हा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.