सांगली जिल्ह्यातील बनपुरी (ता. आटपाडी) येथे एक मन हेलावणारी घटना घडली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून जन्मदाता बाप पोरीसाठी हैवान ठरला. शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून 10 वर्षीय सानिका आणि 11 वर्षीय अनुजाला पित्याने कठोर शिक्षा दिल ज्यात १० वर्षीय सानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे.
नेमकं काय घडलं?
बनपुरी येथील नाना हैबत यमगर या नराधम बापाने शेजारच्या घरात चोरी केल्याच्या केवळ संशयावरून आपल्या सानिका आणि अनुजा या दोन मुलींना अमानुष शिक्षा देण्याचे ठरवले. बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्याने दोन्ही मुलींचे हात-पाय बांधले आणि त्यांना घरातील पत्र्याच्या अँगलला 'उलटे' टांगून ठेवले. या दोन्ही निष्पाप मुली रात्रभर वेदनेने तडफडत होत्या. त्या आपल्या आई-वडिलांकडे 'पाणी.. पाणी..' म्हणून आक्रोश करत होत्या. मात्र, या निष्ठूर आई-वडिलांना त्यांची साधी दयाही आली नाही.
धक्कादायक म्हणजे, पोटच्या पोरी वर टांगलेल्या असताना हे आई-वडील त्यांच्या खालीच निर्धास्तपणे झोपले होते. रात्रभर झालेल्या या छळामुळे सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनुजा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली.
गुरुवारी सकाळी सहा वाजता मुलींच्या आजोबांनी त्यांना खाली उतरवले. मात्र, मुलींना खाली का सोडले, या रागातून नराधम बापाने स्वतःच्या पित्यावरच (आजोबांवर) कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. सानिकाचा मृत्यू झाल्याचे समजताच, हे भयंकर कृत्य लपवण्यासाठी आई-वडील आणि काही नातेवाईकांनी मिळून सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पोलिसांना याचा सुगावा लागणार नाही.
या प्रकरणाचा भांडाफोड गंभीर जखमी असलेल्या अनुजामुळे झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुजा शुद्धीवर आली. तिने डॉक्टरांना बापाने दिलेल्या अमानुष वागणुकीचा आणि सानिकाच्या मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे ऐकून डॉक्टरही सुन्न झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आणि या सैतानी कृत्याचा पर्दाफाश झाला. दरम्यान या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.