बॅटरी वापरुन गुप्तांगावर विजेचा शॉक, कानामागे चाकूने खोलवर वार; व्यापाऱ्याला क्रूरपणे संपवलं
बॅटरी वापरुन गुप्तांगावर विजेचा शॉक, कानामागे चाकूने खोलवर वार; व्यापाऱ्याला क्रूरपणे संपवलं
img
वैष्णवी सांगळे
कोल्हापूर जिल्ह्यातल्या दानोळी गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला क्रूरपणे संपवलंय. याप्रकरणी पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव भरतेश्वर राजगोंडा टोपगोंडा असे असून, शेरी मळा परिसरातील शेतात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे

नेमकं काय घडलं ?
सोमवारी रात्री घरी निघालेल्या भरतेश्वर यांना अडवून आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यांच्या मोबाइलवरून चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना फोन करून '25 लाख रुपये फ्लॉवर व्यवहाराचे देणे लागते, घेऊन ये' असे सांगितले. महावीर यांनी 'व्यवहार समोर बसून मिटवा' म्हणताच फोन कट करण्यात आला. रात्री अकरा वाजता नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खंडणीच्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकवून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी केवळ 'बेपत्ता' नोंद घेऊन 'उद्या बघू' म्हणून हाकलल्याचा आरोप आहे. नातेवाईक, मित्र आणि पोलिस पाटील प्रशांत नेजकर यांनी रात्रभर शोध घेतला. मंगळवारी सकाळी सहा वाजता शेरीमळा रस्त्यावर भरतेश्वर यांची गाडी आणि चप्पल सापडली. दुपारी 12 वाजता ऊसाच्या फडात भरतेश्वर यांचा मृतदेह मिळाला.

मृतदेहावर झालेल्या निर्घृण मारहाणीचे पुरावे पोलिसांसाठी धक्कादायक आहेत. कानामागे चाकूने खोलवर वार दिसून आले. तर मान, पोट, कान आणि गुप्तांगावर बॅटरीच्या साहाय्याने विजेचा शॉक देण्यात आला होता. या तीव्र यातनांनंतर गळा दाबून खून झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले आहे. अपहरणानंतर मध्यरात्रीच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. भरतेश्वर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. जयसिंगपूर पोलिसांनी राजदीप अजय ताडे (वय 21), मंथन ऊर्फ टिल्लू राजेंद्र चंदुरे-पवार (वय 21, रा. दानोळी) यांना अटक केली आहे. 

मोबाईल दुकानदारावर पूर्वीपासून डोळा
आरोपींनी तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मोबाईल दुकानात खरेदी करत दुकानदाराच्या दानोळी मार्गावरील वेळेची चौकशी केली होती. त्याच रात्री दुकानदार न आल्याने भरतेश यांचे अपहरण केले. अटकेत असलेल्या आरोपींनी हे सविस्तर कबूल केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही पूर्वनियोजित योजना असल्याचे तपासातून उघड होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group