भाविकांना लाथा-बुक्क्यांचा प्रसाद, कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण
भाविकांना लाथा-बुक्क्यांचा प्रसाद, कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण
img
वैष्णवी सांगळे
कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात काल परिते गावातील काही नागरिक दर्शनासाठी गेले होते. यावेळी पुजारी आणि या नागरिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान ज्योतिबा मंदिर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.



माहितीनुसार, ज्योतिबा मंदिरात 15 ते 20 पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित पुजारी भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून आले. तर, व्हिडिओत दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

एका बाजूला काही नागरिक मद्यप्राशन करुन हुलडबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच देवकार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान परिते ग्रामस्थांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मद्य प्राशन केल्याचा दावा खोडून काढत ज्योतिबा मंदिर मधील पुजाऱ्यांनी या वादाची सुरुवात केल्याचं परिते ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गावचे सरपंच मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली.  

दरम्यान,  याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group