लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरातील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे महायुतीला राम राम ठोकणार असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभेतील अपयश पचवून विधानसभेला नव्या जोमाने सामोरं जाण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार गटाला निवडणुकीपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात धक्का बसू शकतो. तर आगामी विधानसभेला युतीत थांबलो तर उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. या पराभवानंतर युतीतीतल धुसफूस बाहेर आली. कोल्हापुरातील काही भाजप नेत्यांनी अजित पवार गटाने प्रामाणिकपणे काम केलं नसल्याचे आरोप केले होते. याला अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत आपण मंडलिक यांचं काम केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे युतीतील अंतर्गत वाद समोर आले होते.
काही दिवसांपूर्वी के.पी. पाटील यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर टीका करत त्यांना घरचा आहेर दिला होता. अशातच आता निवडणुकीपूर्वी के.पी. पाटील हे महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करतील असं बोललं जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील के.पी. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मोठे नेते आहेत.
के.पी. पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली तर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुतीसाठी मोठा धक्का ठरणार आहे. राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. विद्यमान आमदार असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांना आमदारकी लढवायची असेल तर 'मविआ'शिवाय पर्याय नाही. या कारणामुळे ते मविआत जाऊ शकतात.