महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून ६ पेक्षा अधिक वेळा कार्यरत राहिलेले अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रत्येकाच्या मदतीला धावणारे, मतदारसंघातला असो किंवा मतदारसंघाच्या बाहेरचा, ज्याचा मुद्दा पटला त्याचं काम करून देणारा नेता म्हणजे अजितदादा, अशी अजितदादांची ओळख. मात्र इतरांच्या स्वप्नाला आकार देणारे, त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे अजितदादा स्वतः मात्र दोन स्वप्नापासून दूर राहिले. त्यापैकी पहिलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद.
जे पोटात तेच ओठावर.... हा अजित पवारांचा स्वभाव. त्यामुळे अजित दादाच्या मनातली स्वप्नं महाराष्ट्रापासून कधी लपून राहिली नाहीत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनणं हे त्या यादीतलं सर्वात पहिलं स्वप्न. मात्र मुख्यमंत्रिपदानं वारंवार अजितदादांना हुलकावणी दिली. सन 2004 साली जेव्हा मुख्यमंत्रिपदाची संधी आली, तेव्हा मात्र, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा मान काँग्रेसला दिला. पण, दुसरीकडे दादांनी उपमुख्यमंत्रिपदाचा विक्रम मात्र मोडून काढला. राज्याचे मुख्यमंत्री बदलत राहिले, पण उपमुख्यमंत्री अजित पवार कायम राहिले.
जसं दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अधुर राहिलं, तसं राष्ट्रावादीचे वेगळे झालेले दोन संसार एक करण्याचंही स्वप्नही अजितदादा मागे सोडून गेलेत. राष्ट्रवादी दोन झाल्या होत्या, पण पवारांच्या कुटुंबात ओलावा कायम होता. महापालिकांच्या निवडणुकांपुरत्या पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनासाठी सर्वात जास्त आग्रही होते अजित पवार. तसे जाहीर संकेतही त्यांनी वेळोवेळी दिले होते. अजितदादांच्या हयातीत राष्ट्रवादी दुभंगली, मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं सर्वार्थानं मनोमिलन होण्याआधीच अजितदादांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांचं हे स्वप्नही अधूरच राहिलं.