एसीबीची मोठी कारवाई, महावितरणाच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना 36 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!
एसीबीची मोठी कारवाई, महावितरणाच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना 36 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूर : कोल्हापुरात लाचखोरांच्या यादीमध्ये आता महावितरणच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांचा भर पडली आहे. अनधिकृतपणे वीज वापर केल्याने झालेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहायक लेखापाल रंगेहाथ सापडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. 

मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई कोल्हापुरातील महावितरणच्या स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात केली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर (वय 47, रा. खासबाग मैदान, मंगळवार पेठ, कोल्हापूर, मूळ सोमवार पेठ पन्हाळा, ता.पन्हाळा) व सहायक लेखापाल रवींद्र बापूसाहेब बिरनाळे (वय 38, रा. आमराई रोड, शिक्षक कॉलनी, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

ग्राहकाकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी बिरनाळे महावितरणच्या स्टेशन रोडवरील कार्यालयात आला होता. कारवाईची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करुन पकडले. 

तडजोडीने 55 हजार रुपयांची रक्कम मागितली 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ग्राहकाने स्वत:च्या इमारतीत औद्योगिक परवाना वीज जोडणी करून घेतली होती. तेथील व्यवसाय बंद झाल्यानंतर त्या ग्राहकाने ती इमारत औद्योगिक परवाना वीज जोडणीसह कराराने भाड्याने दिली होती. सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या औद्योगिक परवाना वीज मीटरची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ग्राहकाने अनधिकृत वीज वापरल्याबद्दल त्याला दोषी ठरवले होते. 

यानंतर 5 वर्षांचा एकूण 1 लाख 22 हजार 678 रुपये दंडाची नोटीस देण्यात आली.हे प्रकरण सुंदर बागेजवळील महावितरणच्या कार्यालयांतर्गत येत असल्याने तेथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटणकर आणि बिरनाळे यांनी त्या ग्राहकाला 5 वर्षाऐवजी फक्त एक वर्षाचा दंड करण्यासाठी म्हणून दंडाची रक्कम 19 हजार आणि दोघांसाठी 41 हजार अशी 60 हजारांची मागणी केली. यानंतर तडजोड करून 55 हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली.19 हजार रुपये दंड सोडून 36 हजार लाचेची रक्कम ठरली.

दरम्यान लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे तसेच पाटणकरने बिरनाळेला रक्कम देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हा व्यवहार मुख्य कार्यालयात होणार होता. त्याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group