कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 'व्हॅलेंटाइन डे' या प्रेमाचा दिवस समजल्या जाणाऱ्या दिवशी भयानक प्रकार समोर आला आहे. आनंदनगर परिसरातील एका झाडावर अज्ञात व्यक्तीने एका तरुणीचा फोटो आणि काळी बाहुली हळद कुंकू लावून खिळ्याने झाडाला ठोकल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक सकाळी फेरफटका मारत असताना त्यांना हा प्रकार दिसला, या प्रकाराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हा प्रकार भानामतीसारखा असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. संबंधित फोटो असलेलय तरुणीची ओळख अद्याप अस्पष्ट आहे. या संतापजनक प्रकारामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे की कोणी बदनामी करण्याच्या हेतूने हे सर्व केले आहे याची माहिती अस्पष्ट आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे.