कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात बोलकेवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून सुट्टी घेऊन गावी आलेल्या गणेशभक्ताचा बाप्पाचे स्वागत करताना दारात पाय घसरून डोक्यावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन शिवाजी सुतार (वय 38) असे दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे.
याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने गंभीर इजा झाल्याने सचिनचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. सचिन सुतार गणेश उत्सवासाठी मुंबई येथून गावी दोन दिवसापूर्वी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी धांदल सुरु असताना अशा पद्धतीने सचिन यांच्यावर मृत्यू ओढवल्याने बोलकेवाडी गावात सन्नाटा पसरला.
नेमका प्रसंग काय घडला?
सचिन मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. पत्नी आणि मुलाला मुंबईत ठेवून ते गणेशोत्सवासाठी सोमवारी गावी आले होते. गणरायाच्या स्वागतासाठी घरी जय्यत केली होती. मंगळावी बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा गणपती मित्र घेऊन आल्यानंतर दारात पोहोचले. गणपती स्वागत करून घरात घेण्यासाठी ते आईला हाक मारत धावत घरी गेले. त्यावेळीच त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांनी मुंबईला परत येतो, असे सांगून गावी आलेल्या सचिन यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. कर्ता पुरुष गेल्याने सुतार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.