हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात अगदी लहान वयात येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली गावामध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. याठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण गावडे हा चिमुकला खेळत होता. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने खेळ सोडून तो घरी पळत आला. आईच्या कुशीत डोकं टेकवलं आणि श्रावणने प्राण सोडले. श्रावणला त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
श्रावणचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. श्रावणच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे श्रावणच्या कुटुंबासह कोडोलीतील आनंदनगर वसाहतीवर शोककळा पसरली आहे.