गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडत आहे. या वाढत्या थंडीचा गंभीर परिणाम वृद्ध अन् चिमुकल्यांच्या आरोग्यावर जास्त होताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे हाडं गोठवणाऱ्या थंडीचा परिणाम हृदय आणि मेंदूवर थेट होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये थंडीमध्ये हॉर्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागही चिंतेत आहे.
कानपूरमध्ये हार्ट अटॅक अन् ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० पेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे.स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, कानपूरमधील रूग्णालयात गेल्या आठवडाभरात हार्ट अॅटक आणि ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत कानपूरमध्ये हार्ट अॅटक अन् ब्रेनस्टोकमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे.
थंडीच्या काळात स्वत:ची काळजी न घेणं जिवावर बेतू शकते, असा सल्ला तज्ज्ञाकडून दिला जात आहे. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यातील कडाक्याची थंडी शरीरावर अतिरिक्त दबाव टाकते. त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच थंडीमध्ये हार्ट अॅटक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.