मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुण क्रिकेटपटूच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. इतकेच नाही तर बमोरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या इंदूरच्या कायस्थ खेडी येथे राहणाऱ्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं डोकं खूप दुखायला लागलं. यातच तिचा मृत्यू झाला. तसेच राजगड जिल्ह्यातही नवोदय शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अटॅक आल्याने आपला जीव गमवावा लागला. एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे.
तिन्ही जिल्ह्यांतील डॉक्टर्सनी मृत्यूचं कारण सायलेंट अटॅक असल्याचं सांगितलं आहेत. मात्र, मृत्यू मागचं नेमकं कारण कळण्यासाठी मृतांच्या एका रिपोर्टची वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , गुना जिल्ह्यातील बमोरी येथे एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान अचानक दीपक खांडेकरच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की, दीपकला कार्डियक अरेस्ट आला आहे. तो 30 वर्षांचा होता.
17 वर्षीय मुलगी रिंकू रविवारी दुपारी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय कचनारिया येथे 12 वीची विद्यार्थिनी होती. मैत्रिणींसोबत बसून ती मका खात होती. यावेळी ती अचानक खाली पडली आणि तिच्या मैत्रिणींनी काही लोकांना बोलावलं. यानंतर रिंकूला खुजनेर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
तसेच इंदूरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या हेमलताचाही मृत्यू झाला. कुटुंबीयांचा दावा आहे की, त्यांची मुलगी हेमलता ही नववीत शिकत होती, तिला अचानक डोकेदुखीचा त्रास झाला. तिला तातडीने एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सीपीआरनंतरही हेमलताच्या शरीरात कोणतीही हालचाल न झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान एकाच दिवशी घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे