नाशिक : खळबळजनक ! तोतया पोलिसांनी दोन महिलांचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले
नाशिक : खळबळजनक ! तोतया पोलिसांनी दोन महिलांचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पोलीस असल्याची बतावणी करुन शहरातील आर्टिलरी सेंटर रोड व जेलरोड परिसरात दोन महिलांना गंडा घालून सुमारे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.



फसवणुकीचा पहिला प्रकार खोले मळा येथे घडला. फिर्यादी विजया पूनमचंद ठोळे (वय 74, रा. स्वाती बंगला, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) या काल सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जैन मंदिरात देवदर्शनासाठी पायी जात होत्या. त्या महेश भवनसमोर आल्या असता पाठिमागून एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. 

मी पोलीस आहे, आमचे मोठे साहेब तुम्हाला बोलावत आहेत, असे सांगून वृद्धेला रस्त्याच्या कडेला घेऊन गेले. दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखी करून वृद्धेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख रुपये किंमतीच्या 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व 20 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे दागिने फसवणूक करुन हातचलाखीने लंपास करून पळून गेले.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ करीत आहेत.

फसवणुकीचा दुसरा प्रकार जेलरोड येथे घडला. फिर्यादी निलम प्रकाश पहिलाजानी (वय 61, रा. मंगेश रो-हाऊस, जेलरोड, नाशिकरोड) ही महिला काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास शनिमंदिरात देवदर्शनासाठी पायी जात होत्या. नारायणबापूनगर येथे विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ त्या आल्या असता समोरून एका मोटारसायकलीवरून आलेले दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येऊन थांबले. 

आम्ही पोलीस आहोत, मराठी शाळेजवळ एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत, असे सांगितले. तसेच त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखी करून फिर्यादीला बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लबाडीच्या इराद्याने हातातून काढून घेत मोटारसायकलीवरून भरधाव वेगात पसार झाले. 

ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने उपनगर पोलीस ठाणे गाठून तोतया पोलिसांविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार काकडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group