पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये अपहरण करुन हत्या ; नेमकं काय प्रकरण ?
पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये अपहरण करुन हत्या ; नेमकं काय प्रकरण ?
img
Dipali Ghadwaje
खाणीतील खोदकामाच्या उपकरणांचा १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथरूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार रुपये काढून घेतल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड), असे उद्योजकाचे नाव आहे. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांना एक ई-मेल आला होता. त्यावरून त्यांनी संबंधितांना फोन केला होता. ‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून, १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे’, अशी बतावणी समोरून करण्यात आली.

त्यानंतर संबंधितांनी शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार शिंदे हे ११ मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर शिंदे यांचे संबंधितांसोबत बोलणे झाले, त्यानुसार शिंदे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथील खाण पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

 त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्याने शिंदे यांच्या कुटुंबाने १२ एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शिंदे यांचे लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागांत आढळून आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचे एक पथक पाटणा येथे रवाना झाले. पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले.

त्यानंतर पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी शिंदे यांचा शोध घेतल्यानंतर सोमवारी (१४ एप्रिल) बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह सापडला. दरम्यान, आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून ९० हजारांची रक्कम काढून घेऊन मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचे उघड झाले.

पाटणा पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group