जळगाव शहरातील प्रजापत नगरमध्ये क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मित्राने मित्राचा खून केलाय. हर्षल प्रदीप भावसार असे हत्या करण्यात आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
हर्षल भावसार हा तरुण जळगाव एमआयडीसीतील एका चॉकलेटच्या कंपनीत कामाला होता. कामावरून घरी आल्यानंतर बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र हर्षल रात्री घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी रेल्वे रुळावर हर्षलचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.
हर्षलच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्याने कुटुंबीयांनी हा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. या संशयावरून पोलिसांनी सखोल चौकशी करत हर्षल हा मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता आणि त्यावेळी परेश नावाच्या मित्राला हर्षलने "चोर पऱ्या " म्हटल्याने या रागातून मित्रांमध्ये भांडण झालं.
मित्रांनी हर्षलला मारहाण केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीवरून या संपूर्ण प्रकाराचा उलगडा केला. शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयित भूषण संजय महाजन, लोकेश मुकुंदा महाजन, परेश संजय महाजन या तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भूषण महाजन याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोन जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.