जालना : जालन्यातील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कंटेनरवर कारवाई करून ७७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. २५ लाखांच्या कंटेनरसह गुटखा असा एक कोटी दोन लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग करताना ही मोठी कारवाई केली आहे.
मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरला रात्र वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीकडून मुंबईकडे हा कंटेनर जात होता. यामध्ये 180 गोण्या गुटख्याच्या आढळून आल्या. वाहनासह एकूण 1 कोटी 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे. यापुढे देखील मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.