छत्तीसगढमधील सक्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथेअकरावीत शिकत असणाऱ्या तरुणीने अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:ची जीभ कापून ती भोले बाबाला अर्पण केली . एवढ्यावरच न थांबता तिने स्वत:ला मंदिरात कोंडून घेतले आणि ध्यानाला बसली. हा धक्कादायक प्रकार सक्ती जिल्ह्यातील देवरघाटा गावातील आचारीपाली येथे घडला असून ही मुलगी १६ वर्षाची असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गावातील लोकांनी पोलिसांना घेराव घालत मंदिरात जाऊ दिले नाही. हे प्रकरण दाभ्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.
सोमवारी सकाळी 7 वाजता तरुणीने तिची जीभ कापून ती घराजवळील तलावाच्या काठावरील भोले बाबाच्या मंदिरात अर्पण केली. तरुणीने एक चिठ्ठीही लिहिली.
दुसरीकडे, तरुणीच्या पालकांना पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजावून तिला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली, मात्र पालकांनी स्पष्ट नकार दिला.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे. तरुणीने असे पाऊल का उचलले याची चौकशी पोलिस स्थानिकांकडे करत आहेत.