पोलिसांचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात. त्यातील काही कौतुकास्पद तर काही टीकेचे धनी ठरून पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे ठरतात. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत या पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मालवणी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि तीन पोलिस कॉन्स्टेबल अशा चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याने पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप कदम हे ‘मालवणी मोबाइल-एक’ येथे कर्तव्य बजावत असताना त्यांचा एक व्हिडीओ १६ सप्टेंबर रोजी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पोलिस पैसे स्वीकारत असल्याचा आरोप करीत पोलिसांवर टीका करण्यात आली होती. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ १८ सप्टेंबर रोजी व्हायरल झाला.
यावेळी मालवणी मोबाइल-एक या गाडीवर कॉन्स्टेबल संजय रासकर, विकास माळी आणि महेंद्रकुमार मराळ हे तिघे कर्तव्य बजावत होते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. या दोन्ही व्हिडीओंची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर विभागीय चौकशीच्या अधीन राहून पोलिस उपायुक्तांनी प्रदीप कदम यांच्यासह संजय रासकर, विकास माळी आणि महेंद्रकुमार मराळ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.