पुणे : पुण्यातील माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. मात्र, पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरांच्या बहिणींना पोलसांनी अटक केली होती.
त्यानंतर, आज सायंकाळी ताम्हिणी घाटातून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणात गंभीरतेने लक्ष घालून पुण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोमाने प्रयत्न केल्याचं दिसून येतं , या आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अनेक पथके नेमून शोधासाठी रवाना केली होती.
दरम्यान, आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षांतराजकारणात सक्रिय झालं. मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचाय . त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होती.
पुण्यातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी, थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यातच वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरगुती संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी तपासातून समोर आलं आहे.