गडचिरोली : मूलबाळ होत नसल्यामुळे पत्नीला मारहाण करून तिच्यावरतीच पिस्तूल रोखणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत असणाऱ्या तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार , अविनाश शेंबटवाड असे आरोपी तहसीलदाराचे नाव असून सध्या ते कोठडीत आहेत. अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मगनपुरा भागात त्यांचे सासर असून पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
दीड वर्षांपूर्वी अविनाश यांचे थाटामाटात लग्न झाले. मात्र, दीड वर्षानंतरही मुळबळ होत नसल्यामुळे ते पत्नीचा सतत छळ करीत असून जादूटोण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप पत्नीने तक्रारीतून केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नांदेड जिल्ह्यातील मगनपुरा भागात माहेर असलेल्या अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीच्या दिलेल्या तक्रारीनुसार, आई- वडिलांनी त्यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिला होता. लग्नामध्ये सर्वांना मानपान, सोने व अन्य साहित्य देखील दिलं होतं. लग्नानंतर तहसीलदार पती अविनाश यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना काही ना काही कारण काढून मारहाण करत असत, त्याचबरोबर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती पिस्तूलही रोखल्याचा दावा अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीने केला आहे.
या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार पती अविनाश शेंबटवाड यांच्यासह त्यांची आई, वडील व डाॅक्टर असलेल्या दोन भावांच्या विरोधात देखील कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 11 मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे.
अविनाश शेंबटवाड हे नांदेडमध्ये असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना 13 एप्रिल रोजी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.