किनवट तालुक्यातील पांगरी या गावातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान विषबाधा कोणत्या कारणामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आले नसून आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कुटुंबाची तपासणी केली जात असून गावातील पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट पांगरी या गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यात गावात राहणारे अनिकेत गणपत वनेकर (वय १५), ऋषिकेश गणपत वनेकर (वय ११) व आई सुचिता गणपत वनेकर असे विषबाधा झालेल्याची नावे असून हे तिघेही एकाच कुटुंबातले आहेत. या तिघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा झाल्याची माहिती समजताच नांदेड येथून आरोग्य पथक लागलीच गावात दाखल झाले आहे. पथकातील डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या कुटुंबातील नातेवाईकांची प्रत्यक्षपणे भेट घेवून त्यांची विचारपूस केली.
मात्र विषबाधा कशातून झाली आहे? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र पीडित कुटुंबाने वांग्याची भाजी, खिचडी आणि कलाकंद खाल्ल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.
पांगरी गावात तिघांना झालेली विषबाधा हि पाण्यातून तर झाली नाही; याची तपासणी करण्यासाठी गावात दाखल झालेल्या डॉक्टरांनी येथील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवीले आहेत.