नांदेड येथील सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. जातीयवादातून झालेल्या या हत्येमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. मात्र, अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट अजूनही ‘लाइव्ह’ असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे “आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे सोशल मीडिया अकाउंट सुरू कसे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
संबंधित अकाउंटचे नाव ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) असे असून, या अकाउंटवर आरोपीचे हातात बेड्या घातलेले आणि पोलिसांच्या हातात हात घातलेले फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे या अकाउंटवरील प्रत्येक पोस्टवर भडक पंजाबी गाणी लावण्यात आली असून, कॅप्शनमध्येही आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर शब्दांचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, या हत्याकांडानंतर नांदेड शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. सक्षम ताटेची प्रेयसी आंचल तसेच त्याच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. तर सक्षम ताटेच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.