भरधाव ट्रकने चक्क ८ दुचाकी चिरडल्या ; भीषण अपघातात दोघे ठार
भरधाव ट्रकने चक्क ८ दुचाकी चिरडल्या ; भीषण अपघातात दोघे ठार
img
Dipali Ghadwaje
नांदेड : नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या ८ दुचाकींना चिरडले. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. नांदेड ते भोकर रस्त्यावरील बारड येथे ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भोकरवरून नांदेडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बारड येथे ८ दुचाकींना चिरडल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोकरहून नांदेडकडे येत असलेल्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानंतर ट्रकने बारड चौकातील जवळपास आठ दुचाकींना चिरडले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोविंद रामजी कोडेवाड (वय ४०, रा. खरबी, ता. भोकर) यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना तात्काळ बारड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी नांदेड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामध्ये ट्रकसोबत दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group