सध्या अपघाताच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. तसेच समृद्धी महामार्गावर देखील अनेक भीषण अपघाताच्या घटना सध्या घडत आहेत.
दरम्यान आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या पिकअप वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.
धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक ९७ जवळ मागून आलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात घटनास्थळी ५ जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी २ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. तर तब्बल २५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयासह सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सावंगी येथे १९ जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर धामणगाव येथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत.