भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजी पाटील (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला. मनोरजवळील दुर्वेश गावाच्या हद्दीत त्यांची भरधाव फॉर्च्युनर कार एका अवजड वाहनावर पाठीमागून आदळल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत संभाजी पाटील यांनी प्राण गमावले असून, त्यांचा सहकारी प्रणय प्रशांत चौधरी (वय 22) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेमबाज संभाजी पाटील आणि त्यांचा मित्र प्रणय प्रशांत चौधरी हे पुण्याहून गुजरातला जात होते. सोमवारी (9 फेब्रुवारी)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पालघरच्या दुर्वेश गावाच्या हद्दीत प्रणय याने भरधाव कार दुसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत नेताना समोरच्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने दोन वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाटील यांची जागीच मृत्यू झाला तर प्रणय जखमी झाला आहे.
अपघातानंतर महामार्ग पोलिस आणि मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांना रुग्णालयात तपासून मृत घोषीत करण्यात आले तर प्रणय यांच्यावर उपचार सुरु आहेत. संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती मनोर पोलिसांनी दिली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या हद्दीत झालेल्या या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटील यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. पुण्याहून गुजरातकडे येत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ दुर्वेश गावाच्या हद्दीत भरधाव फॉर्च्युनर कार अवजड वाहनाला मागून धडकली. या कारचे बोनेट संपूर्णपणे नष्ट झाले असून केवळ मागचा भाग आणि चाकेच उरली आहेत.