देवदर्शनासाठी आनंदाने निघालेल्या मित्रांचा प्रवास अखेरचा ठरला! भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सेल्फी काढण्यासाठी ब्रिजवर थांबणे तरुणांच्या जीवावर बेतले. प्रयागराज-वाराणसी महामार्गावरील (NH-19) रूपापूर गावाजवळ सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले. विंध्याचल धाम येथे दर्शन घेऊन वाराणसीला परतणाऱ्या तरुणांच्या कारला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आठ मित्र एका कारमधून प्रवास करत होते. ओव्हरब्रिजवर आल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्वजण खाली उतरले. यावेळी काही जण सेल्फी काढत होते, तर काही जण पुलाच्या कठड्याजवळ उभे होते. त्याचवेळी मागून आलेल्या वेगवान ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जण पुलावरून खाली फेकले गेले, तर घटनास्थळी मृतदेह विखुरले गेले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलावरून तीन मृतदेह आढळले, तर आणखी एक मृतदेह पुलाखाली सापडला. खाली पडलेल्या एका तरुणासह अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची नावे आनंद यादव (२५), आलोक मिश्रा (३०), प्रदीप सिंह (३६) आणि विद्वाआंशु यादव (३०) अशी आहेत. जखमींमध्ये कन्हैया यादव आणि निखिल कुमार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर ट्रक सोडून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्त कारमध्ये प्रसादाचे डबे, नारळ आणि इतर पूजेचे साहित्य आढळल्याने तरुण देवदर्शन घेऊन परतताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.