आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप! ९०० फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू; घातपात की अपघात? पोलिसांकडून तपास सुरू
आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप! ९०० फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू; घातपात की अपघात? पोलिसांकडून तपास सुरू
img
नितीशा कुलकर्णी












"महाबळेश्वरजवळील निसर्गरम्य आंबेनळी घाटात पर्यटनाचा आनंद लुटायला आलेल्या एका दांपत्याचा ९०० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि काळोखाचे आव्हान पेलत बचाव पथकाने जीवाची बाजी लावून हे मृतदेह बाहेर काढले.

मात्र, रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल आणि दरीत कोसळलेलं हे जोडपं, यामुळे ही घटना नेमकी कशी घडली? हा अपघात आहे की घातपात? या प्रश्नांनी आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे." महाबळेश्वर  तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत ही दुर्घटना घडली. अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यांमुळे काल मध्यरात्री बचावकार्य थांबवावे लागले होते.

मात्र, आज सकाळपासून पुन्हा एकदा दाम्पत्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये, दोघांचेही मृतदेह आढळून आले असून पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने वरती काढण्यात आले. आंबेनळी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक पथकांकडून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली.

दोरांच्या सहाय्याने बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता सुमारे 900 फूट खोल दरीत उतरुन शोधकार्य केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरुषाचा मृतदेह सापडला, तर त्यानंतर सुमारे 150 फूट खाली महिलेचा मृतदेह देखील आढळून आला.

या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान, रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने बचावकार्य तात्पुरते थांबवावे लागले होते. आज सकाळी बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने पुन्हा संयुक्तपणे मोहीम सुरू केली. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बचाव पथकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करुन दाम्पत्य खोल दरीत पडल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात असून हा अपघात आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group