ओझर-पिंपळगाव महामार्गावर शिरपूर-नाशिक एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. टायर फुटल्याने पुलावर बस डिव्हायडरला धडकल्याने या अपघाताचा थरार घडला आहे.
अधिक माहिती अशी की , ओझर-पिंपळगाव महामार्गावरील एचएएल कंपनीसमोरील उड्डाणपुलावर शिरपूर डेपोच्या नाशिककडे जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. MH 15 JC 8331 क्रमांकाची बस टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गावरील काही विजेचे खांब तोडत डिव्हायडरवर आदळली. या अपघातात चार ते पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बस डिव्हायडरवर आदळल्याने विजेच्या खांबांचेही नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताची परिस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली.
बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही. चार ते पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.