सध्या होणारी वाहतूक कोंडी , ट्राफिक आणि भरधाव वाहने यांच्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून आता अशाच एका भीषण अपघाताची घटना घडली आहे.
समोर आलेलया माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघाताची घटना घडली. धुळे ते म्हसदी मार्गावरून धावणाऱ्या एका बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. ट्रकची धडक इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेत ४० ते ४५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाकडून तातडीने उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी पसरताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
स्थानिकांमुळे वाचला अनेकांचा जीव एसटी बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर म्हसदी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बसमधील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने स्थानिकांनी बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली अन् जखमींना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. धुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.