आरक्षणाचा मुद्दा पेटणार? गावबंदी असतानाही ताफा गावात, मराठा बांधवांनी भाजप खासदाराच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या
आरक्षणाचा मुद्दा पेटणार? गावबंदी असतानाही ताफा गावात, मराठा बांधवांनी भाजप खासदाराच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या
img
Dipali Ghadwaje
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसताना दिसून येत आहे. 

मराठा आरक्षणासाठी गांवबंदी असतानाही गावात आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे.  नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते.

खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले. आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असं म्हणत संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरलं. यावेळी एक मराठा, लाख मराठा. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली. दरम्यान, संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. 

यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झालेय. दरम्यान, मराठा समाजाच आक्रमक झाल्याचं लक्षात येताच चिखलीकर यांनी तातडीने अंबुलगा गावातून काढता पाय घेतला. 

विशेष बाब म्हणजे, गुरुवारी अंबुलगा येथील मराठा संघटनांनी गावात एकमताने ठराव घेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. ही बाब चिखलीकर यांच्या लक्षात नव्हती. अशातच चिखलीकर आणि त्याचे कार्यकर्ते अंबुलगा गावात येताच मराठा तरुण एकत्र जमले. त्यांनी वाद घालत चिखलीकर यांना गावातून परत पाठवले. दरम्यान सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group