नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
दि. 24 ऑगस्ट रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नाशिक दौर्यावर आले असताना त्यांना मराठा समाजाला 50 टक्के ओबीसीतून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदा करावा, यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या सांगण्यावरून मुंबई नाका पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या व कार्यकर्ते आणि नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला, हे अतिशय चुकीचे असून, याप्रकरणी सकल मराठा समाजात नाराजी आहे.
याबाबत आता सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यासाठी म्हणून शिवतीर्थ येथे उद्या सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर, नाना बच्छाव व इतर कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये समाजाच्या इतर नागरिकांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदन स्वीकारतात; परंतु विरोधी पक्ष मात्र निवेदन स्वीकारत नाहीत. त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही निवडून दिले, तर चूक केली का, असा प्रश्नदेखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या ओबीसीतून आरक्षण मिळावे सग्यासोयर्याचा जीआर तत्काळ अंमलबजावणी करून लागू करावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना, मंत्र्यांना आम्ही संविधानिक पद्धतीने आमच्या मागणीचे निवेदन देत आहोत; परंतु या गोष्टीचा सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधकांना जास्त त्रास होत आहे. त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात गांभीर्य नाही, म्हणून संपूर्ण दिवसभर नजरकैदेत ठेवतात. निवेदन दिले तर गुन्हा दाखल करायला सांगतात. या गोष्टीचा आम्हाला प्रचंड मनस्ताप होत असल्याकारणाने आम्ही एक दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी सांगितले.