मराठा आरक्षण;  30 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
मराठा आरक्षण; 30 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
img
दैनिक भ्रमर
मराठा आरक्षणाचा प्रश्न  सध्या ऐरणीवर आहे. दरम्यान राज्यातील जवळपास 30 लाख मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी नोंदी  मिळू शकणार आहेत. “सरकार सकारात्मक आहे. अशी माहिती  मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली.  या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख नेते, उपसमितीमधील मंत्री आणि मराठा समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास दोन तास ही बैठक चालली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जवळपास 30 लाख मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी नोंदी मिळू शकणार आहे असे सांगितले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. 1882 ची वैयक्तिक कुणबी नोंद सापडली तरी कुणबी आरक्षण मिळणार. सरकारने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीला अशा एकूण 1 लाख 77 हजार नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या अशा नोंदी मिळाल्या, त्यांचे इतर नातेवाईक 300 जरी पकडले तर 300 गुणिले 1 लाख 77 हजार नोंदी केले तर 30 लाख नोंदी होतात,” असे गणित मांडले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “समितीने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. यामधून सर्वसाधारण मराठा व्यक्तीदेखील आता वेबसाईटवरील या नोंदी बघून यातील कुठला पुरावा आपल्याकडे सापडतो का? हे बघू शकतो. यापूर्वी 10 पुराव्यांमध्ये ती सापडत नव्हती. पण आता 42 पुराव्यांमध्ये ती सापडते. त्यामुळे आता मराठा समाज धावत पळत जाऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतो,” अशी माहिती दिली. “मराठा समाजाला एसीबीसी वर्गातून आरक्षण दिल्यानंतरही वेगळे 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर ते आम्ही कोर्टात टिकवू. याआधीचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच दिलेले मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यावेळी ठाकरे सरकारने पुरेशी मेहनत घेतली नाही, असा आमचा आरोप आहे.” असे ते म्हणाले.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आमचा दावा असा आहे की, मराठा समाजाला दिलेले सीबीसी आरक्षण आम्ही टिकवू. तरीसुद्धा मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की, आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या.” तसेच, यावेळी ते म्हणाले की, “आम्ही मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांच्या नेत्यांशी संवाद साधला. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा संपर्क केला. ते आजारी असल्यामुळे फोनवर आले नाहीत. पण त्यांच्या वतीने एक सरपंच येत होते पण काही कारणांनी तेही आले नाहीत. पण आम्ही एक नोट पाठवतो. ती नोटसुद्धा आजच्या बैठकीत आम्ही वाचून दाखवली. त्या अर्थाने त्यांचेसुद्धा म्हणणं त्या बैठकीत आले.” असे सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group